शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी ‘एवढी’ वाहने चोरीला

52

पिंपरी, दि. 20 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात दाखल केल्या जात आहेत. शनिवारी (दि. 19) पिंपरी चिंचवड परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये सहा वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कासारवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेसमोर पार्क केलेली दुचाकी 15 जून रोजी दुपारी सव्वा एक ते दीड वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सागर खंडू सावळे (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.

आळंदी जवळ केळगाव येथे ज्ञानाई कॉलनीतून एक दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार 13 जून रोजी सकाळी उघडकीस आला. सोसायटीच्या पार्किंग मधून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली. याबाबत नामदेव भारत मात्रे (वय 27, रा. केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माऊलीनगर झित्राईमळा चाकण येथील एका घरासमोरून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत किसन भगवंता गोरे (वय 32) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 जून रोजी पहाटे उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक प्रकार तळेगाव दाभाडे येथील शांताई  फेज 2 येथे शनिवारी सकाळी उघडकीस आला. चेतन प्रमोद घाटे (वय 41, रा. लक्षद्वीप शांताई, फेज 2, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्याने त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीचा दुसरा प्रकार सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलच्या समोर घडला. राजू लक्ष्मण गायकवाड (वय 27, रा. ताजे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पवना हॉस्पिटलच्या गेट जवळून चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आला.

संजय किसनराव मुंडे (वय 36, रा. कोयनानगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुंडे यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. 11 जून रोजी दुपारी दोन ते दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांची दुचाकी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare