शहरात रेल्वेच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

41

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – शहरात रेल्वेच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ एका व्यापाऱ्याचा तर आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ एका अभियंत्याचा रेल्वे धडकेने मृत्यू झाला.  या दोन्ही घटना आज (मंगळवार) पहाटे उघडकीस आल्या.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. हरीश दीपक करमयानी (वय ३२, रा. साई चौक, पिंपरी) असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचा नाव आहे. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला. हरीश यांचा पिंपरीमध्ये व्यवसाय आहे.

तर दुसऱ्या घटनेत, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून एका अभियंत्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी सहाच्या सुमारास घडली. पांडुरंग लक्ष्मण दोडतोडे (वय ३४, रा. सायली अपार्टमेंट, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. पांडुरंग एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करीत होते. दोन्ही अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान नागरिकांनी रेल्वेरुळ ओलांडताना ओव्हर ब्रिजचाच वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.