शहरात चोऱ्यांच्या घटनात वाढ; 25 लाखाहून अधिक मुद्देमाल चोरीला

157

भोसरी, दि.७ (पीसीबी) : मागील चार दिवसात पिंपरी – चिंचवड शहरात 37 चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल, पैसे, दागिन्यांची चोरी झाली आहे. या सर्व घटनांमध्ये तब्बल 25 हजार 86 हजार 247 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. भोसरी, सांगवी, चिंचवड, निगडी, पिंपरी, देहूरोड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 12 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या 12 घटनांमध्ये दोन लाख 92 हजार 297 रुपये किमतीचे 17 मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

निगडी, चाकण, एमआयडीसी भोसरी, हिंजवडी, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा घटनांमध्ये 17 लाख 61 हजार 500 रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. यामध्ये जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. वाहन चोरट्यांनी शहरात हैदोस घातला आहे. चार दिवसात 17 वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून वाहन चोरीच्या घटनांमध्ये 5 लाख 56 हजारांच्या 16 दुचाकी आणि एक रिक्षा चोरीला गेली आहे. वाकड येथे दरोडा टाकून चोरट्यांनी 12 हजार 500 रुपये चोरून नेले.