शहरात चोरट्यांची दहशत: नागरिक हैराण

61

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) : शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दररोज चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. मंगळवारी (दि. 16) चोरीच्या नऊ घटना उघडकीस आल्या. चाकण, वाकड, निगडी, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, आळंदी परिसरातून तब्बल 22 लाख 62 हजार 745 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

प्रमोद बबनराव बोराटे (वय 41, रा. कडेगाव, ता. दौंड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बोराटे यांच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी कारमधून 20 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या कालावधीत बाणेर येथे घडली.
विलास ज्ञानदेव सावळे (वय 49, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोडकेवाडी, माण हिंजवडी येथील बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी 21 हजार 125 रुपये किमतीची 65 सिमेंट पोती चोरून नेली आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. मानकर चौकातील एका स्पा सेंटरचे शटर उचकटून 52 हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मनोज देवेंद्र गोविंद (वय 38, रा. थेरगाव) यांची 25 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत गोविंद यांनी फिर्याद दिली आहे. कस्पटेवस्ती वाकड येथील एका मोबाईल टॉवर मधून 40 हजारांच्या 96 बॅट-या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी सुधीर नानासाहेब शिंदे (वय 47, रा. मांजरी बु.) यांनी फिर्याद दिली आहे.

उन्मेष पंढरीनाथ कोकरे (वय 55, रा. चिंचवड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचे नाणेकरवाडी येथे वर्कशॉप आहे. अज्ञात चोरट्यांनी वर्कशॉपच्या गेटचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. वर्कशॉपमधून स्टेनलेस स्टीलचे तयार केलेले जॉबचे पार्ट, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर, एलसीडी असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. आकुर्डी येथील एका घरातून चोरट्याने पाच हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला. याबाबत नजीम अहमद मुन्ना अहमद (वय 21, रा. कदम चाळ, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमाटणे फाटा येथील जव्हेरी कॉम्प्लेक्समधून अज्ञात चोरट्यांनी दहा हजारांची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी दुर्गेश माणिक जव्हेरी (वय 39) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरे येथील पोलीबॉन्ड कंपनीच्या आयटी स्टोअरमध्ये चोरी झाली आहे. चोरटयांनी नऊ हजार 620 रुपये किमतीचे स्कॅनर मशीन चोरून नेले. याप्रकरणी सुरज प्रकाश नाईक (वय 28, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या आयटी कर्मचारी अथवा कंपनीतील इतर कर्मचारी यांच्यापैकी कुणीतरी हे मशीन चोरून नेल्याचा फिर्यादी यांचा संशय आहे.

WhatsAppShare