शहरात कृत्रिम पाणी टंचाई करून पाणी कपातीचा निर्णय; नाना काटेंचा आरोप

138

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. तरी देखील शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे  शहरातील टँकर लॉबीला फायदा पोहोचविण्यासाठी शहरात कृत्रिम पाणी टंचाई करून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केला आहे.

यासंदर्भात नाना काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कटिबद्ध जनहिताय हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांना समान न्याय मिळणे आवश्यक आहे. सर्वांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. परंतु, नियोजन शून्य आणि भोंगळ कारभारामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित करून पाणी कपातीचा मनमानी निर्णय सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. तातडीने ही पाणी कपात रद्द करावी, तसेच शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा  नाना काटे यांनी या पत्रकात दिला आहे.