शहरातील ‘ओमायक्रॉन’च्या 62 पैकी 59 रुग्ण संसर्गमुक्त, 3 सक्रिय रुग्णांवर उपचार..

63

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा आजपर्यंत संसर्ग झालेल्या 62 रुग्णांपैकी 59 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून 3 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरात आणखी एक नवीन रुग्ण आज (बुधवारी) आढळला.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. आज शहरात ओमायक्रॉनचे आणखी एक नवीन रुग्ण आढळला. रँन्डम तपासणीत ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परदेशातून आलेल्या 72 कोरोना बाधित रुग्णांची पुन्हा 10 व्या दिवशी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा 1901 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1854 जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले 60 तर त्यांच्या संपर्कातील 35 जण पॉझिटीव्ह आले. तर, 1759 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या 60 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 31 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. संपर्कातील 35 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 16 ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत 15 रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आले आहेत. 59 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत. तर, 3 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.