शहरवासियांना आणखी किती दिवस वेठीस धरणार ; लांडे यांचा संतप्त सवाल

108

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – सत्तेत आल्यावर आम्ही दररोज पाणी पुरवठा करू, अशा बढाया सत्ताधाऱ्यांनी मारल्या. मात्र प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर पाणी पुरवठ्याबाबत त्यांचे ढिसाळ नियोजन सुरू झाले आहे. अद्यापही नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सत्ताधारी केवळ दिखावा करण्यात आणि बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सुचना करण्यात व्यस्त आहेत. पाणी पुरवठ्याची दिलेली कमिटमेंट फेल गेली असल्याचे वास्तविक चित्र आहे. दिवसाकाठी त्वरित पाणी पुरवठा करा. अन्यथा शहरवासिय तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता अद्यापही नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना रोज पाणी पुरवठा करू, अशा बढाया मारल्या होत्या. वास्तविक सत्तेत आल्यानंतर त्यांना या अश्वासनाचा विसर पडला असल्याचे दिसते. आंद्रा, भामा व आसखेडच्या पाण्याचे तर गाजर दाखविले जात आहे. अद्याप हा प्रकल्प मार्गी लावला नाही. हे प्रकल्प मार्गी लावण्याची धमक सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी आयुक्त राजेश पाटील यांना अनेक वेळा निवेदने दिली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी नोव्हेंबर 2021 अखेर पिंपरी चिंचवड करांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्द दिला. परंतु तो शब्द पाळला गेला नाही. पाण्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे, असा आरोप लांडे यांनी केला आहे.

विशेषतः मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी, डुडुळगाव, चिखली, जाधववाडी या पट्ट्यात मोठं मोठे गृह प्रकल्प विकसित झाले आहेत. तेथील लाखो लोकांना गेल्या चार वर्षांपासून पाणी विकत घ्यावे लागत आहे. मग पवना धरणातून उचलले जाणारे 490 एमएलडी पाणी फक्त अर्ध्या शहराला सोडले जाते का ? आणि अर्धे शहर टँकर माफियांद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोसले आहे का ? असा संतप्त सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.

अन्यथा सत्ताधाऱ्यांना नागरिकच पाणी पाजतील –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाणी पुरवठा नियोजनाचा आदर्श सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवा. राष्ट्रवादीने 15 वर्ष महापालिकेत सत्ता हाताळली. त्यावेळी शहरवासीयांना नित्यनियमाने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ते जमत नसल्याचे दिसते. वास्तविक धरणातील पाणी साठा पुरेसा असताना एक दिवसाआड पाणी पुरवठा का केला जात आहे, असा सवाल लांडे यांनी उपस्थित केला. मुबलक पाणी नेमके कुठे वळविले आहे ? पाणी नेमके कुठे मुरत आहे याचा शोध घ्या, अशी मागणीही माजी आमदार विलास लांडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. पाणी पुरवठ्याचे रखडलेले प्रकल्प त्वरित मार्गी लावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नागरिकच पाणी पाजतील, असा इशारा माजी आमदार लांडे यांनी दिला.