शशी थरुर भाजपची भाषा बोलत आहेत – उद्धव ठाकरे

65

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘हिंदू पाकिस्तान’ वक्तव्यावर भाष्य करत भाजपालाही चिमटे काढले आहेत. शशी थरुर यांनी २०१९ मध्ये भाजप विजयी झाला तर भारत हा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल असे सांगितले. पुढील निवडणुकीत मोदींचे राज्य आले तर भारत ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल. संघाचा हाच अजेंडा आहे व थरुर यांनी तो काँग्रेसच्या व्यासपीठावरून मांडला आहे. थरुर हे मूर्खासारखे बोलतात व त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी असे भाजपास वाटते. पण थरुर हे भाजपचीच भाषा बोलत आहेत हे समजून घेतले पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

बायकोच्या खून प्रकरणात शशी थरुर हे महाशय आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर आहेत. त्यामुळे थरुर यांची मानसिकता व नियत याविषयी काय बोलावे? थरुर यांच्या विधानाची गांभीर्याने दखल घ्यायची गरज नाही. पण भाजपने मात्र थयथयाट सुरू केला आहे. थरुर यांच्या विधानामुळे हिंदूंचा अपमान झाला. हिंदुस्थानची मान शरमेने खाली गेली, अशी विधाने भाजपच्या प्रवक्त्याने केली आहेत.

मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरुर यांच्या बेताल विधानांमुळे फक्त करमणूक होत असते हे ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारणात उगाच लुडबुड करू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.