शरद पवार यांच्या बेळगाव दौऱ्याने भाजपा प्रचंड अस्वस्थ

83

बेळगाव, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बेळगावला भेट दिली. वादग्रस्त असणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाला शरद पवार यांनी दिलेल्या भेटीमुळे भाजपाच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसने मात्र ही भेट राजकीय नसल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी राणी चेन्नम्मा यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी बेळगाव जिल्ह्यतील कित्तूरला भेट दिली. त्यानंतर शरद पवार यांनी एक ट्वीट केले. “आज उत्तर कर्नाटकातील अंकली येथे कित्तुरच्या वीर राणी चेन्नम्मा यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करताना मला अतिशय आनंद झाला आहे. राणी चेन्नम्मा यांनी आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीशी लढा दिला. राणी चेन्नम्मा यांचे बलिदान तरूण पिढीला, विशेशत: महिलांना नेहमीच प्रेरणा देत राहील”.

राणी चेन्नम्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी लिंगायत समाजाचे नेते आणि माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी शरद पवार यांना आमंत्रित केले होते. लिंगायत समाजाचे नेते माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी शरद पवार यांना आमंत्रित केल्यामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रावादी कॉंग्रेसने मात्र “ही भेट राजकीय नसून शरद पवार आणि प्रभाकर कोरे याच्यात खासदार असल्यापासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशभारतील सर्व पक्षीय नेत्यांसोबत नाते जोडण्यासोबतच शरद पवार यांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण केले आहे. जी व्यक्ती दुसऱ्या पक्षातील नेत्यांशीसुद्धा जिव्हाळ्याने वागते त्या व्यक्तील आपल्या घरी सर्वच आमंत्रित करतात. एका जवळच्या व्यक्तीला दिलेले आमंत्रण या व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने या भेटीकडे पाहण्याची गरज नाही”, असे राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
यावर बोलताना “कोरे यांचा लिंगायत समाजावर मोठा प्रभाव असून ते सध्या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे कोरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत असे वाटते. तसे नसते तर त्यांनी शरद पवार यांना कार्यक्रमाला का बोलवले असते?” असा प्रश्न एका भाजपा नेत्याने उपस्थित केला आहे. बेळगावचे भाजपा आमदार अभय पाटील म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे हा लिंगायत समाजाचा कार्यक्रम होता, भाजपाचा नाही. शरद पवार आणि प्रभाकर कोरे यांचे राज्यसभेचे सदस्य असल्यापासूनचे संबंध आहेत”. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की “झाशीची राणी ज्याप्रमाणे ब्रिटिशांशी लढल्या त्याचप्रमाणे ब्रिटिशांशी लढणाऱ्या वीर राणी चेन्नम्मा यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी आमचे पक्षप्रमुख इथे आले. या व्यतिरिक्त या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही”. राणी चेन्नम्मा या लिंगायत समाजाच्या होत्या. महाराष्ट्रात लिंगायत समाजाच्या लोकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के आहे, तर कर्नाटकात लिंगायत समाजाच्या लोकसंख्येच्या १६ टक्के आहे.

दिग्गज मराठा नेत्यांच्या भेटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर पाटील म्हणाले की, “आमच्या पक्षाला इतर समाजातील नेत्यांप्रमाणेच लिंगायत समाजातील लोक महत्वाचे आहेत. पण पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टीकोनातून बघू नये. हा विषय आता संपला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयातील एका लढवय्याच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होता. राणी चेन्नम्मा या स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत”.

महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव शंकर पाटील म्हणाले, “सोलापूर, लातूर, कोल्हापूर आणि सांगली या सीमावर्ती भागात लिंगायत समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. लिंगायत समाजाचे लोक राणी चेन्नम्मा यांना झाशीच्या राणीप्रमाणेच मानतात. इंग्रजांकडून त्यांचा पराभव झाला असला, तरी त्या इंग्रजी राजवटी विरोधात शौर्याने लढल्या. त्यांच्या शौर्याने फक्त स्वातंत्र सैनिकांनाच नाही तर पुढच्या पिढीलाही प्रेरणा दिली आहे”.

शंकर पाटील यांनी लिंगायत समाजाने सहकार आणि इतर क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा आलेख मांडला. कॉंग्रसचे लातूरमधील शिवराज पाटील हे केंद्रीय मंत्री मंडळात मंत्री झाले आणि पुढे त्यांनी राज्यपाल पदसुद्धा भूषवलं. बाबा कल्याणी यांच्यासारखे उद्योगपती लिंगायत समाजाचेच आहेत. सोलापूरचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महाराज हे लिंगायत समाजाचेच आहेत. लिंगायत समाजाने महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्राच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. यापुढे त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाखांच्या आसपास आहे. त्यात ५ ते ६ लाख लोक हे लिंगायत समाजाचे आहेत. शहरी भागात लिंगायत समाजाच्या लोकांची संख्या १० टक्के आहे.