शरद पवार यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अनेकांची तोंडे बंद…

260

– शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या विरोधातील विलास लांडे यांचा डाव उधळला

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेहमीप्रमाणे केंद्रसरकार, राज्यातील भाजपचे नेते यांच्यावर टीका केली. पवार यांनी या शहराच्या दृष्टीने केलेले एक महत्वाचे विधान दुर्लक्षिले गेले. पिंपरी चिंचवड मधील निवडणुकीची सूत्रे कोणा एकाच्या हाती नाहीत! असे पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. या एकाच विधानाचे अनेक अर्थ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघू शकतात. दरम्यान, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या विरोधातील माजी आमदार विलास लांडे यांचा डाव सपशेल उधळला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुळात पवार यांचा हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे झाला. विद्यमान शहराध्यक्षांना बदलण्यासाठी हा निकराचा प्रयत्न होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार यांच्या ते त्वरित लक्षात आले असावे.शनिवारी शहरात आल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रातील सत्ताधारी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. केंद्र सरकार इडी, आयकर खाते यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करून राज्य सरकारला अडचणीत आणू पाहत आहे असा पवार यांच्या कथनाचा सारांश होता. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असे ठाम प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी या पत्रकार परिषदेत यथोचित समाचार घेतला.

आणि, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी ‘पिंपरी चिंचवड मधील निवडणुकीची सूत्रे कोणा एकाच्या हाती नाहीत!’एव्हढे एकच सूचक वाक्य बोलून विषय संपवला. या एका वाक्यात त्यांनी अनेक तोंडे बंद केली.
एका वाक्यात अनेक गोष्टी साध्य करण्याचे त्यांचे कसब देशातील अन्य कोणत्याही राजकारण्याकडे नाही. या एका वाक्यातून निघणारे विविध अर्थ पाहिले तर आपल्या लक्षात येईल की शहाराध्यक्षांच्या हाती निवडणुकीबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार असणार नाहीत.
निवडणुकीची सूत्रे स्थानिक पातळीवर कोणाच्याही हाती असणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आणि शहराध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील स्वतःच्या पातळीवर हा निर्णय घेणार नाहीत यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याबरोबर सल्लामसलत करावी लागेल असा दुसरा संदेशही पवार यांच्या एका वाक्यातून जातो आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सध्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत
अधूनमधून ते पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शहरातील राजकारण यासंदर्भात भाष्य करत असतात त्यांची ट्विट्सही नेहमीच चर्चेत असतात त्यांनादेखील स्वतंत्रपणे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात हस्तक्षेप करता येणार नाही. एवढ्या गोष्टी पवार यांनी आपल्या एका वाक्यातून स्पष्ट केल्या आहेत.

महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘इलेक्टिव्ह मेरीट’ असलेल्या अर्थात निवडून येण्याची क्षमता असलेल्या भाजपमधील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ असे सूतोवाच केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ‘इनकमिंग’ सुरूही झाले होते. भाजप मधील योग्य कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षात आणायचे आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे. त्यांच्या माध्यमातून भाजपला शह देत महापालिकेत आपली सत्ता प्रस्थापित करायची अशी रणनीती अजित पवार यांनी आखली होती.

अजित पवार यांच्या या डावपेचामुळे पक्षातील काही स्थानिक नेते साशंक होते. महाविकास आघाडी एकत्र लढणार असेल तर काँग्रेस आणि शिवसेनेला किती जागा दिल्या जाणार आणि भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारांना जागा दिल्यास ‘आपले काय होणार?’ अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचे कामही शरद पवार यांच्या या एका वाक्याने केले आहे. त्याचबरोबर येत्या महापालिका निवडणुकीत 50 टक्के नव्या तरुण चेहऱ्याना संधी देण्यात येईल असे त्यांनी रविवारी मेळाव्याला मार्गदर्शन करताना जाहीर केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील तरुणवर्ग सुखावला आहे.

मात्र, यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भाजपमधील सक्षम कार्यकर्ते पक्षांतर न करता भाजपतर्फेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांच्यासमोर तितकेच सक्षम उमेदवार देण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस समोर असणार आहे. ते पेलण्याची जबाबदारी एकट्या शहराध्यक्षांची नाही याची जाणीव ठेवून अन्य नेत्यांनी शहराध्यक्षपदाच्या खुर्चीकडे किंवा निवडणुकीतील उमेदवारीकडे डोळे लावून न बसता अंगझाडून, एकदिलाने कामाला लागले पाहिजे. अन्यथा पुन्हा एकदा पुढील पाच वर्षे राष्ट्रवादीला महापालिकेत विरोधी बाकांवर बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

WhatsAppShare