शरद पवार यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी चाललेय वाटतं…

110

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांना टोला हाणला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात शरद पवार ज्या पद्धतीनं सक्रिय झालेत ते पाहता त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी चाललेय असं वाटतं,’ असं पाटील म्हणाले.

कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाठदुखीवर उपचार घेतल्यापासून त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री पदाबद्दलही चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांकडं हे पद सोपवावं, असा सल्लाही विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना दिला आहे. त्याच मुद्द्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. ‘मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांच्या घरातील व्यक्तीच्या नावाची चर्चा आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा इतर कुणावर विश्वास नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तर अजिबात नाही. शरद पवार ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत आहेत, त्यावरून त्यांनाच मुख्यमंत्री व्हायची घाई लागल्याचे दिसते, असं पाटील म्हणाले. ‘प्रत्येक बाबतीत शिवसेनेला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागत आहे. शिवसेनेत नेतृत्त्वाचा एवढा दुष्काळ यापूर्वी कधी आला नव्हता, असा चिमटाही त्यांनी काढला.

‘शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून गोव्यासह उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे दोन्ही पक्ष पूर्वीच्या अनुभवावरून शहाणे होण्याऐवजी पुन्हा एकदा तोंडावर पडण्याची तयारी करत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजप यश मिळवेल. पंजाबमध्ये आमच्यासाठी निवडणूक फार सोपी नाही. राष्ट्रवादी पक्ष विविध राज्यांत एखादी जागा निवडून आणते, पण शिवसेना ताकद नसताना उगाचच टिमकी वाजवते, असा खोचक टोला त्यांनी हाणला.

मोदींच्या हत्येचा कट?

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली. ‘पंजाबमध्ये घडलेल्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी गांभीर्याने घेण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली. २ ते ४ जानेवारी दरम्यान पंजाबमधील अधिकाऱ्यांनी, मोबाइलवरील संभाषणातून मोदींच्या दौऱ्यावेळी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली होती. पण त्याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. पंजाबचे मुख्यमंत्री चेन्नी हे कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधींना घडामोडींची माहिती देत होते. याचा अर्थ काँग्रेस आणि पंजाब सरकारनं मिळून पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. काँग्रेसचा हा खोटेपणा लोकांसमोर आणण्यासाठी भाजप रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशारा त्यांनी दिला.