शरद पवार-प्रशांत किशोर भेटीवरती अजित पवारांच मोठं वक्तव्य. म्हणाले, ‘हि भेट…

115

पुणे, दि.११ (पीसीबी) : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा धुडकावून लावल्या आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार म्हणाले कि, ‘प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत.’

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, प्रशांत किशोर हे सिल्वहर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघेही बंद दाराआड चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोघेही एकत्र जेवण घेणार आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे या भेटीची मोठी उत्सुकता आहे.

WhatsAppShare