शरद पवारांसह सर्वजण बेकार झालेत – उद्धव ठाकरे

151

मुंबई, दि. ९ (पीसीबी) स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देणार असल्याचे विरोधक सांगत आहेत. मात्र, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. आताही बेकारांना संधी आम्ही देणार याच्यासाठी आम्ही काम करतोय. मात्र, आता शरद पवारांसह विरोधक बेकार झाले आहेत. त्यामुळे त्यांना बेकारी काय असते हे आता कळले आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. संगमनेरमध्ये साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

आमच्याकडे आता सगळे हाऊसफुल झाले आहे सर्व चांगले लोक आमच्याकडे आलेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे तुमचा विस्तव पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच दहा निवडून येतील ते तरी आमचे सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असे होणार असेल तर मग कशाला त्यांना मत द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी संगमनेरच्या जनतेला केले. दरम्यान, विरोधीपक्ष नेते असतानाही सरकारच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही युतीच्या परिवारात आलात याला धाडस लागते, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटलांना मी धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नगर जिल्ह्यातील नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, थोरातांचे नेते बँकॉकला गेले आहेत, त्यामुळे त्यांनी आता घरी जायला हरकत नाही. ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी थोरातांना त्यांच्याच भागात आव्हान दिले. सुशीलकुमार शिंदेंनी देखील आता आम्ही थकलो आहोत अशी कबुली दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

WhatsAppShare