शरद पवारांनी दोनवेळा काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळेच होते का? खासदार काकडेंचा खोचक सवाल

184

पुणे, दि. १९ (पीसीबी) – सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळत आहेत. काहींनी प्रवेश केला आहे तर काहीजण अजुनही प्रतीक्षेत आहेत. यामुळे पक्षसोडून जाणाऱ्यांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना कावळ्याची उपमा दिली.

हा शब्द भाजपचे सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या चांगलाच जिवारी लागला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, स्वतः शरद पवार यांनी दोनवेळा काँग्रेस सोडली. मग आज राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना शरद पवार जर कावळे म्हणत असतील तर, जेव्हा शरद पवार यांनी दोनदा काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का? असा खोचक टोला काकडे यांनी पवारांना लगावला आहे.

शरद पवार यांच्यासारखा जेष्ठ नेत्याने अशी वक्तव्ये करणे खर तर अपेक्षित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असलेले विजयसिंह मोहिते पाटील, पिचड, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीला रामराम करून भारतीय जनता पक्षात का आले याविषयी शरद पवार यांनी मनापासून एकदा तरी आत्मपरीक्षण करावे. वीस वीस वर्षे बरोबर राहिलेली माणसं आता दूर का जातायत हे त्यांनी तपासून पहावे, असेही काकडे म्हणाले.