शरद पवारांना दुखावले, तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही – रामराजे नाईक निंबाळकर

163

सातारा, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दुखावले, तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही. पण शरद पवारांना दुखावले नाही, तर समोरच्या हजारों लोकांचे आयुष्य चांगले होणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत होणारी संभ्रमावस्था बोलून दाखवली.  

फलटणमध्ये  आज (शुक्रवार) कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

निंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी सोडण्याची मनाची तयारी आहे, परंतु युतीच काय होते, हे पाहून निर्णय घेणार  आहे. शरद पवार यांना या वयात सोडून जाण्याचा विचार करु शकत नाही.  कुठलाही राजकीय निर्णय घेण्याच्या आधी कार्यकर्त्यांची मते जाणून घेणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच मतदानाच्या आधी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतो.

पक्षात कुठल्या जायचे, पक्ष सोडायचा की नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही मला दिलेला आहे. पण तरुण पिढीसाठी आपल्याला हे करावे लागणार आहे. आज तरुण पिढीला आपण मार्गदर्शन करण्याऐवजी तरुण पिढी आपल्याला मार्गदर्शन करते. माझ्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो शरद पवारांना न दुखावता निर्णय घेण्याचा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.