शरद पवारांच्या विधानामुळे पार्थच्या मावळमधील उमेदवारीवर सस्पेंन्स

224

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर संदिग्धता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवार कोण? याची यादी दोन तीन दिवसात अध्यक्ष जाहीर करतील, असे सांगून पार्थ पवार यांचे नाव  घेण्याचे टाळले. 

शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी  एका कार्यकर्त्याने पार्थ पवार यांना १०० टक्के निवडून आणण्यासाठी काम करणार, असे सांगितले. त्यावर पवार यांनी उमेदवार कोण याची यादी दोन तीन दिवसात अध्यक्ष जाहीर करतील, असे सांगून  पार्थ यांच्या उमेदवारीवर सस्पेंन्स कायम ठेवला.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सोशल मीडियावर जास्तीत जास्त भर देणे आवश्यक आहे. खोटी बातमी आल्यानंतर ती बातमी खोडून काढली पाहिजे. चुकीच्या बातम्यांना सोशल मीडियातून उत्तर दिले पाहिजे. मात्र, हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहूनच करा.  नवीन पिढीचा सोशल मिडियाकडे कल आहे, असे देखील पवार म्हणाले.

WhatsAppShare