शरद पवारांचे डोके ठिकाणावर आहे का ? – उध्दव ठाकरे

1246

मुंबई, दि. १३ (पीसीबी)  काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पुण्यात आलो की टिळक पगडी नको, फुले पगडी घालून स्वागत करा, अशी सुचना पक्षाच्या पदाधिकऱ्यांना केली होती. यावर  पवारांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल करून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबईत आचार्य अत्रे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पगडी प्रकरणावर बोलताना  पुण्यात आलो की टिळक पगडी नको फुले पगडी घालून स्वागत करा, असे आदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, या विधानावर टीका होऊ लागल्यानंतर  पवार यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, याच मुद्दयावर आता उध्दव ठाकरे यांनी  शरद पवारांवर टीका केली.

सध्या आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचे राजकारण करत आहोत. मात्र, ते करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. आपण टिळक, महात्मा फुले यांचे कार्य विसरतो आहोत आणि त्यांच्या पगडीवरून राजकारण करण्यात धन्यता मानतो आहोत असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.