व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत ‘असा’ घातला लाखोंना गंडा

152

चिखली, दि.२१ (पीसीबी) – व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून सात लाख 70 हजार रुपये घेतले. घेतलेली रक्कम परत न करता व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना पाच जुलै 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत शेलारवस्ती, चिखली येथे घडली.

लक्ष्मीकांत गिरमलअप्पा सिंत्री (रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत जनार्दन कुंभार (वय 42, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शेलारवस्ती चिखली येथे ॲल्युमिनियम कास्टिंग बनवण्याचा कारखाना आहे. त्यांना व्यवसायावर कर्ज काढायचे असल्याने त्यांनी आरोपीला बँकेकडे कर्ज प्रकरण करण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडे वैयक्तिक व आर्थिक अडचणी सांगून पैशांची मागणी केली होती.

फिर्यादी यांनी आरोपी याच्यावर विश्वास ठेवून बँक खात्यातून सहा लाख 70 हजार रुपये आरोपीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर 1 लाख रुपये रोख रक्कम दिली. आरोपीने फिर्यादी यांच्या कडून घेतलेले सात लाख 70 हजार रुपये फिर्यादी यांनी परत मागितले असता आरोपीने सात लाख रुपयांचा एक धनादेश फिर्यादी यांना दिला. फिर्यादी यांनी तो धनादेश दोन वेळा बँकेमध्ये जमा केला. मात्र आरोपीच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही. याबाबत फिर्यादी यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.