व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’; ‘आधार’ची नवी योजना

242

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता व्यक्तीची ओळख पडताळून पाहण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने अंमलात आणणार आहे. या योजनेची सुरूवात सिम कार्ड खरेदी प्रक्रियेपासून केली जाणार आहे. यासाठी प्राधिकरण सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करणार आहे.

या योजनेंतर्गत नवीन मोबाइल सिम घेण्यासाठी अर्जावर लावण्यात आलेले छायाचित्र त्याच व्यक्तिला समोर बसवून घेण्यात आलेल्या छायाचित्राशी जुळवून पाहिली जाणार आहे. जी मोबाइल कंपनी १५ सप्टेंबरपासून ही सेवा सुरू करणार नाही. त्या कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यूआयडीएआयने दिला आहे.

‘लाइव्ह फेस फोटो’ आणि ‘इ केवायसी’ दरम्यान घेण्यात आलेले छायाचित्र जुळवणे सक्तीचे असेल. यामध्ये मोबाइल सिमसाठी आधारचा वापर होत आहे. फिंगरप्रिंटमधील फेरफाराची शक्यता आणि क्लोनिंग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मोबाइल सिम कार्यरत करण्याची ऑडिट प्रक्रिया आणि सुरक्षा आणखी बळकट  होणार आहे.

सिम जारी करताना आधारचा उपयोग होत असेल तेव्हाच लाइव्ह फेस फोटो हा इ केवायसी फोटोशी जुळता असण्याची गरज आहे, असे  यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी सांगितले. दूरसंचार विभागाच्या सुचनेनुसार जर सिम आधार शिवाय इतर पद्धतीने जारी केले जात असतील, तर हे आदेश लागू होणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.