वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवका विरुध्द गुन्हा दाखल

34

इंदापूरमधील एका लॉजवर ग्रामीण पोलीसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका केली आहे. धक्कादायक म्हणजे वेश्याव्यवसायात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक अनिकेत अरविंद वाघ आणि लॉजचालक अजय बाळसाहेब शिंदे (दोघे रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापुरातील खडकपुरा भागात असलेल्या रूपाली लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हंकारे यांना मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक- लॉजमालक वाघ आणि लॉजचालक शिंदे हे युवतींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आल्यानंतर शुक्रवारी (दि.६) पोलिसांनी तेथे  छापा टाकला. पोलीस निरीक्षक हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ननावरे, खंडागळे, पोमणे, यांनी ही कारवाई केली. दरम्यान, वेश्याव्यवसायात राष्ट्रवादीचा नगरसेवक सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर इंदापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.