वेळ आली तर दूध आंदोलन गनिमीकाव्याने होईल- राजू शेट्टी

68

कोल्हापूर, दि. ७ (पीसीबी) – दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणे शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मदत करावी, अन्यथा १६ जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन व्यापक, तीव्र केले जाईल. पोलिस बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन करणार नाही. वेळ आली तर गनिमीकाव्याने आंदोलन होईल, यश मिळाल्याशिवाय मैदान सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.

१६ जुलैपासून होणाऱ्या राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात मेळावा झाला.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘दूध, ऊसदरासाठी शांततेच्या मार्गाने गेल्या आठवड्यात २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा मोर्चा पुणे येथे काढला. त्याची दखल घेतली नाही. सनदशीर मार्गाने केलेले आंदोलन, मोर्चाची दखल घेत नसल्याने १६ जुलैपासून दूध बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलन राज्यव्यापी असणार आहे. जिल्हानिहाय जागृती मेळावे घेतले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसी बळाचा वापर होणार आहे. अशावेळी कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याचा मार्ग स्वीकारायचा आहे.