वेदिका शिंदेच्या १६ कोटींच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क होणार माफ ; खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

147

– केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे आयात शुल्क माफीचे आदेश

भोसरी, दि.९ (पीसीबी) : वेदिका सौरभ शिंदे या ११ महिन्यांच्या लहान मुलीला ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १’ हा दुर्मीळ आजार झाला आहे. त्यावरील उपचारासाठी परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या झोलगेन्स्मा (Zolgensma) इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने १६ कोटींच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्याचे आदेश दिले.

लांडेवाडी भोसरी येथील विकास कॉलनीत राहणाऱ्या सौरभ शिंदे यांची कन्या वेदिका हिला दुर्मिळ असा स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १ हा आजार असून तिच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेदिका वरील उपचारासाठी आवश्यक झोलगेन्स्मा (Zolgensma) इंजेक्शन अमेरिकेतून आयात करावे लागणार आहे. या इंजेक्शनची मूळ किंमत जवळपास १६ कोटी रुपये इतकी असून आयात शुल्क व अन्य कर मिळून २२ कोटी रुपये इतका खर्च येणार होता. त्यानुसार सौरभ शिंदे यांनी मित्रपरिवार व लोकवर्गणीद्वारे इंजेक्शनसाठी लागणारे १६ कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र आयात शुल्क व अन्य करांपोटी भरावी लागणारे ६ कोटी रुपये माफ होणे आवश्यक होते. त्यानुसार शिंदे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांनी सुरुवातीपासूनच वेदिकाच्या उपचारासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. यंदाच्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना डॉ. कोल्हे यांनी वेदिका शिंदे व युवान रामटेककर या दोन्ही मुलांच्या आजाराचा उल्लेख करत स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १ सारख्या दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी देखील केली होती.

दरम्यान वेदिकाचे वडिल शिंदे यांनी इंजेक्शनसाठी आवश्यक १६ कोटीची रक्कम लोकवर्गणीतून जमा करून खासदार डॉ. कोल्हे यांना आयात शुल्क व अन्य कर माफ करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून तसेच ट्विट करुन विशेष बाब म्हणून करमाफीची मागणी केली. इतकेच नव्हे तर इंजेक्शनचे शेललाईफ जेमतेम १५ दिवसांचे असल्याने आयात कर माफीचा निर्णय तातडीने होणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन अर्थमंत्री सीतारामन यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात राहून पाठपुरावा केला. या संदर्भात निर्णय होऊन आदेश निघण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागेल असे अर्थमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र उशीर झाल्यास इंजेक्शनचे शेललाईफ संपण्याची भीती होती. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी ही बाब अर्थमंत्र्यांच्या सचिवांच्या लक्षात आणून दिली.

अखेरीस आज (बुधवारी दि.९) अर्थमंत्रालयाने कस्टम ड्युटी सेक्शन २५ (२) कस्टम अॅक्ट १९६२ अंतर्गत विशेष बाब म्हणून झोलगेन्स्मा (Zolgensma) इंजेक्शन आयात शुल्क माफ करण्याचे निर्देश जारी केले. त्यामुळे वेदिकाच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उपचारानंतर वेदिका लवकरच बरी होऊन सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी सज्ज होईल, असा आशावाद खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

WhatsAppShare