वेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला

42

नवी दिल्ली, दि.१३ (पीसीबी) – भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली.

हिमाने बुधवारी उपांत्य फेरीत देखील ५२.१० सेकंदात पहिला क्रमांक पटकावला होता. पहिल्या राऊंडमध्ये देखील तिने ५२.२५ सेकंदाचा विक्रम केला होता. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती. त्यानंतर सातत्याने तिने आपली वेळ सुधारली. नुकतेच तिने आंतरराज्यीय चॅम्पिअनशीपमध्येदेखील सुवर्णपदक जिंकले होते. या इव्हेंटमध्ये तिने ५१.१३ सेकंदाचा वेळ घेतला होता.

आजच्या ऐतिहासिक विजयानंतर हिमा दास आता स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोपडाच्या क्लबमध्ये सामिल झाली आहे. नीरजने २०१६ मध्ये जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, हिमा ही ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय अॅथलेट ठरली आहे.