वीस हजारांची लाच स्वीकारताना पुणे महापालिकेच्या बिगारी सुपरवायझरला अटक

225

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना पुणे महापालिकेतील एका बिगारी सुपरवायझरला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे  यांनी गुरुवारी (दि. ३०) शिवाजीनगर गावठाण परिसरात केली.

गोपीचंद दत्तात्रेय पठारे (वय ४५) असे लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या बिगारी सुपरवायझरचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपीचंद पठारे हे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात बिगारी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराने २००४ साली केलेल्या बांधकामाच्या नियमितीकरणाचा दाखल प्रमाणित करून घेण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल मिळण्यासाठी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी गोपीचंद पठारे याने तक्रारदाराकडे २५ हजारांची लाच मागीतली होती. तडजोडी करुन २० हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले. तक्रारदाराने लाचलुचपतप्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करून शिवाजीनगर गावठाण येथील दिलीप टी हाऊस या चहाच्या दुकानात लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून आरोपी पठारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.