विषय समिती सभापती पदांची निवड बिनविरोध

3

पिंपरी,दि.१९(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या स्वीनल म्हेत्रे, महिला व बालकल्याण चंदा लोखंडे , शहर सुधारणा सोनाली गव्हाणे , क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक उत्तम केंदळे आणि शिक्षण समितीसाठी मनीषा पवार यांचे अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने एकाही पदासाठी अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. समिती सभापती पदासाठी शुक्रवारी (दि.23) शिक्कामोर्तब होईल.

पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी आज (सोमवारी) दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. विषय समित्यांमध्ये बलाबल कमी असल्याने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपने शिक्षण समितीपदी मनीषा पवार यांना सलग दुसऱ्यावेळी तर स्वीनल म्हेत्रे आणि सोनाली गव्हाणे यांना पुन्हा एकदा सभापतीपद दिले आहे.

महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद कामकाज पाहणार आहेत.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ”पालिकेच्या पाचही विषय समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ तीन सदस्य आहेत. बलाबल नसल्याने आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत”.

WhatsAppShare