कोरोनाचे संकट दूर होवो – पाडुरंग चरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रार्थना

60

पंढरपूर,दि. १ (पीसीबी) – :  लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान विठ्ठल मंदिरात सहा वर्षे सेवा करणाऱ्या बडे दाम्पत्याला यावर्षी मिळाला.

”आपण सगळे जणं माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी. माऊलीच्या समोर सगळे सारखेच आहेत. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे. मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडं घातलं.

बुधवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी यात्रेवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे मानाच्या ९ पालख्या या वारकऱ्यांशिवाय पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पंढरीत गर्दी होऊ नये म्हणून दि २९ जुलै ते २ जुलै या चार दिवसा करीता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आषाढ शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या , पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.
भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी आहे. यामुळे यंदा विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात 30 जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पालख्या एसटी बसने पंढरीला
आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या एसटी बसने पंढरीला पोहोचल्या. इतिहासात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांच्या पादुका या एसटीतून पंढरीला आल्या. तत्पूर्वी पंचपदी अर्थात पाच भजन झाले अन् पादुका मंदिराच्या मुख्य सभा मंडपातून बाहेर पडल्या. मग मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका विठाई बसच्या पहिल्या बाकावर विराजमान झाल्या. पारंपारिक मार्गावरूनच ही एसटी पंढरीकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान इनामदार वाडा, अनगडशाह बाबा दर्गा, चिंचोलीचं शनी मंदिर इथं आरती झाली. तर पुढे रोटी घाटात अभंग आरती पार पडली. मग मानाच्या क्रमातून सर्व बस रात्री पंढरीत आल्या.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर या पालख्या एसटी बसमधून पंढरीत दाखल झाल्या.

संतांच्या पादुका द्वादशी ऐवजी शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार पौर्णिमेला पाठवा
कोरोनामुळे यंदा यात्राच भरली नसली तरी परंपरा न मोडण्यासाठी राज्य सरकारने मानाच्या पादुकांना एसटी बस मधून पंढरपुरात फक्त 20 भाविकांसह आणले खरे मात्र आता पादुका परत जाण्याबाबत वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला असून शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार पौर्णिमेचा काला करून परत फिरायची मागणी केल्याने पेच निर्माण होणार आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपला निरोप आजच रात्री पोहोचवू असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पालखी सोहळ्यासोबतच्या मानकऱ्यांना दिले आहे. आज दशमीला या पादुका रात्री पोहोचल्यावर माऊली पालखी सोहळ्यातील अॅड. ढगे यांनी पादुका द्वादशीलाच परत नेण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शासनाने या पादुकांना एकादशी दिवशी चंद्रभागा स्नान आणि सोबत आलेल्या वारकऱ्यांना नगर प्रदक्षिणेला परवानगी दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला मंदिरात संत भेट घेऊन परत माघारी घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे. यामुळे वारकरी संप्रदाय नाराज असून यंदा समन्वयाची वारी आम्ही करीत आलोय मात्र आजवरच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात कधीही पादुका द्वादशीला परत गेलेल्या नाहीत. आम्हाला आजीनं वारकरी कमी करण्यास सांगितले तरी आम्ही त्याला तयार आहोत. मात्र शासनाने त्यांच्याच वाहनातून पादुकांना द्वादशी ऐवजी पौर्णिमेला काला करून परत जाण्याची परंपरा राखावी अशी विनंती केली आहे.

 

WhatsAppShare