विवाहितेने पतीसोबत मिळून केला ब्लॅकमेल करणाऱ्या बॉयफ्रेंडचा खून

1143

दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – विवाहितेने पतीसोबत मिळून अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या बॉयफ्रेंडचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी (दि.१८ ऑगस्ट) मथुरेत घडली होती.

सुशील कुमार (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी डॉली चौधरी (वय २१) आणि तिचा पती मनीष चौधरी या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणारी डॉली या तरुणीचे सुशील कुमार  या तरुणाशी सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपूर्वी डॉलीची मोहित (वय २७) या तरुणाशी ओळख झाली. मोहितने डॉलीला नोकरी मिळवून देण्यात मदत केली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. डॉली सुशीलला सोडून मोहितसोबत नोएडात राहू लागली. यामुळे सुशील संतापला होता. त्याने डॉलीला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. याच सुमारास मोहितच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. यामुळे मोहित घाबरून बेंगळुरूला पळाला होता. दुसरीकडे डॉलीच्या वडिलांनी तिचे लग्न मनीष चौधरी या तरुणाशी ठरवले होते. मात्र सुशीलकडून डॉलीला ब्लॅकमेलचा प्रकार सुरुच होता. शेवटी डॉलीने मनीषच्या साथीने सुशीलच्या हत्येचा कट रचला.

शनिवारी (दि.११ ऑगस्ट) सुशील डॉलीला भेटायला मथुरेत पोहोचला. तिथे दोघेही दिवसभर फिरले. रात्री डॉलीने सुशीलच्या दारूच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. यामुळे सुशीलचा मृत्यू झाला. शवविच्छेदनातून हा प्रकार उघड झाला.  पोलिसांनी डॉली आणि मनीष या दोघांना अटक केली आहे.