विलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार का?

581

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांची मुदत पुढील महिन्यात २७ जुलै रोजी संपणार आहे. राज्याच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेत पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचा एकही चेहरा नाही. त्यामुळे निवृत्त आमदारांच्या जागेवर राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधीत्व दिले जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल हे दोघेही राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी आर्थिक आणि राजकीय ताकद असणारे नेते आहेत. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. बहल यांना आमदारकीची संधी मिळाल्यास त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार अजितदादा पवार आपल्या बालेकिल्ल्यातील एखाद्या नेत्याला विधान परिषदेवर संधी देतात का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील आमदारांची संख्या ७८ आहे. हे आमदार पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ तसेच विधानसभेतील आमदारांमधून निवडून दिले जातात. निवडून आलेल्या आमदारांमधून विधान परिषदेसाठी ३० आमदारांची निवड केली जाते. पक्षीय संख्याबळानुसार हे आमदार निवडले जातात. सध्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २२ आमदार आहेत. त्यातील चार आमदारांची मुदत २७ जुलै २०१८ रोजी संपणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पुण्याचे अॅड. जयदेव गायकवाड, मुंबईचे नरेंद्र पाटील आणि बीडचे अमरसिंह पंडित यांचा समावेश आहे. हे चौघेही पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.

निवृत्त आमदारांच्या जागेवर नव्या आमदाराची निवड करण्यासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवृत्त आमदारांच्या जागेवर राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधीत्व दिले जाते का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा म्हणजे आमदार अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. महापालिकाही ताब्यात नाही. त्यामुळे येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही. पक्षाच्या ३७ नगरसेवकांमध्ये निरूत्साह आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक नगरसेवक महापालिकेच्या पुढील निवडणुकीत भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरात एक हक्काचा आमदार असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पक्ष म्हणजे आमदार अजितदादा पवार विचार करणार का?, याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच झाले तर माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल यांच्यामध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची पात्रता आहे. या दोघांकडेही आर्थिक आणि राजकीय ताकद आहे. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. विलास लांडे हे चाणाक्ष नेते आहेत. बहल हे आमदार झाल्यास भाजपला काही अंशी वेसण घालणे शक्य होणार आहे. लांडे आमदार झाल्यास केवळ भोसरी मतदारसंघात त्याचा पक्षाला फायदा होणार आहे.

नदीच्या पलीकडे काहीही झाले तरी लांडे त्याकडे लक्ष देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. विरोधात राहून लांडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवल्याचे गेल्या चार वर्षात तरी घडलेले नाही. याउलट योगेश बहल हे भाजपसोबत सातत्याने संघर्ष करत आहेत. महापालिकेच्या सभागृहात अभ्यासूपणे मुद्दे मांडून ते पक्षाचा बुलंद आवाज बनले आहेत. तरीही त्यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेऊन पक्षाने त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचेही समजते. एखादा अभ्यासू नेता नाराज असणे पक्षाला परवडणारे नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची झालेली वाताहत, नगरसेवकांमधील निरूत्साह, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या सर्व बाबींचा विचार करता पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार शहरातील एखाद्याला विधान परिषदेवर संधी देतात का?, हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे.