विरोधकांचा हा पराभव म्हणजे २०१९ निवडणुकांची एक झलक आहे – अमित शाह

41

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – लोकसभेत दाखल झालेला अविश्वास ठराव अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारने जिंकल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांचा लोकसभेत झालेला हा पराभव म्हणजे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची एक झलक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली. अविश्वास ठरावासाठी घेण्यात आलेलं मतदान संपल्यानंतर अमित शाह यांनी एकामागोमाग एक अशे चार ट्विट करुन काँग्रेस आणि विरोधकांवर निशाणा साधला.

”जनतेने दाखवलेल्या विश्वासावर अविश्वास दाखवणाऱ्यांचा आज लोकसभेत झालेला पराभव म्हणजे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची एक झलक आहे. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देशात सत्तेत आलेल्या मोदी सरकारवर केवळ लोकसभा सभागृहातील सहकाऱ्यांचाच नव्हे तर देशातील जनतेचाही पूर्ण विश्वास आहे”. अविश्वास ठरावावरील मोदी सरकारचा विजय हा लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव आहे. घराणेशाही आणि जातीवादाचे जनक असलेल्या काँग्रेसला देशाच्या जनतेने निवडलेला, गरीब कुटुंबात जन्मलेला सामान्य व्यक्ती पंतप्रधानपदी असल्यामुळे किती तिरस्कार आणि घृणा आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले”.