विराटने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम

532

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – नॉटिंगहॅम कसोटीत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एक मोठी कामगिरी केली. क्रिकेट जगतातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा अनेक वर्षे अबाधित असलेला एक विक्रम त्याने मोडित काढला. कसोटी कर्णधार म्हणून सातवेळा २००हून अधिक धावा करून आपल्या संघाच्या विजयात हातभार लावण्याचा पराक्रम विराटने केला. 

डॉन ब्रॅडमन व रिकी पाँटिंग या दोघांनीही कसोटी संघाचे नेतृत्व करताना सहावेळा २००हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली होती. त्यांच्या या धावांचा संघाच्या विजयात मोठा वाटा होता. भारतीय कर्णधारांपैकी केवळ महेंद्रसिंग धोनी याला ही कामगिरी करता आली आहे. धोनीने २०१३ साली ऑस्ट्रेलियाच्या विरोधात चेन्नई इथे २२४ धावांची खेळी केली होती. कसोटी संघाचे नेतृत्व करताना विराटने तब्बल दहावेळा २००हून अधिक धावा केल्या आहेत. त्यापैकी सातवेळा संघाला विजय मिळाला आहे. हाही एक नवा विक्रमच आहे.