विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणे ही मानाची गोष्ट – भुवनेश्वर कुमार

100

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमार हा भारतीय गोलंदाजीचा प्रमुख हिस्सा मानला जातो आहे. आयपीएमध्ये भुवनेश्वरला आपल्या कामगिरीने फारसे प्रभावित करता आलेले नसले तरीही विश्वचषकात भारतीय चाहत्यांना आणि कर्णधार विराट कोहलीला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. भुवनेश्वर कुमारनेही आगामी विश्वचषक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली खेळणे ही मानाची गोष्ट असल्याचे म्हणत आपल्या कर्णधाराचे कौतुक केले आहे.

“विराटच्या नेतृत्वाखाली खेळणे ही निर्विवादपणे एक मानाची गोष्ट आहे. तो आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात काय सुरु आहे हे ओळखतो. तो मैदानात नेहमी आक्रमक असतो. एक गोलंदाज म्हणून अशा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणे हा माझा बहुमान आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आमचा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल याची मला खात्री आहे.” भुवनेश्वर कुमार एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.

आयपीएलआधी भुवनेश्वर कुमार घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. या मालिकेत त्याने ८ बळी घेतले. त्याआधी न्यूझीलंड दौऱ्यातही भुवनेश्वर कुमारने आश्वासक कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.