विनायक मेटे अडचणीच्या काळात मदतीला धावून येतात – मुख्यमंत्री

65

मुंबई, दि. २ (पीसीबी) – शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांच्याशी माझे १९९६ पासून घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये आमच्या दोघांची घट्ट मैत्री झाली आहे. मेटे सर्वांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून येतात. तसेच माझ्याही अडचणीच्या काळात ते मदतीला येतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांचे कौतुक केले.  

मुंबईतील स्वामी नारायण मंदिर सभागृहात आमदार मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मेटे यांच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्ष मी जवळून बघितलेला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी सतत लढा सुरू ठेवला आहे. आघाडी सरकारने आरक्षण देण्याची घोषणा  केली. मात्र, न्यायालयात त्याचा निभाव लागू शकला नाही. त्यामुळे यासाठी आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. तुम्हाला अडचण येत असेल, तर मला मंत्रिपदही नको. केवळ शिवस्मारकाची उभारणी, मराठा आरक्षण व शेतकऱ्यांना  दिडपट हमी भाव देण्यात यावी, अशी मागणी मेटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.