विनाचालक बसची तीन रिक्षांना धडक; एकजण जखमी

94

निगडी, दि.२१ (पीसीबी) : निगडी येथील पीएमपीएमएलच्या बस स्थानकावर विनचालक बस अचानक पुढे गेल्याने बसची तीन रिक्षांना धडक बसली. यामध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी, दि. 21) सकाळी घडली.

पीएमपीएमएल अपघात विभागाचे साहिल काथे यांनी याबाबत माहिती दिली. निगडी बस स्थानकावर गुरुवारी सकाळी एक पीएमपीएमएल बस थांबलेली होती. बसमध्ये चालक नव्हता. अचानक बस पुढे गेली आणि समोर असलेल्या तीन रिक्षांना धडकली. बस नेमकी कोणत्या कारणामुळे पुढे गेली याबाबत चौकशी सुरु आहे.

या घटनेत एका रिक्षा चालकाच्या उजव्या हाताला मनगटाजवळ दुखापत झाली आहे. सचिन ज्ञानेश्वर शिंदे असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. जखमी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निगडी येथील पवळे उड्डाणपुलाशेजारी पीएमपीएमएल बस स्थानक आहे. या बस स्थानकावरून पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात बहुतांश ठिकाणी बस धावतात. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच रिक्षा चालक देखील या बस स्थानकाजवळ गराडा घालून थांबलेले असतात. याचा पीएमपीएमएल बस चालक, प्रशासन, प्रवासी आणि पादचारी नागरिकांना नाहक त्रास होतो.

बस स्थानकाजवळ अधिकृत रिक्षा थांबा नसतानाही मोठ्या प्रमाणात रिक्षा थांबलेल्या असतात. काही रिक्षा रस्त्यात उभा करून रिक्षा चालक पॅसेंजर भरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते. प्रसंगी अनेकवेळा अपघात होण्याची दाट शक्यता असते. गुरुवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलीस रिक्षा चालकांच्या बाबतीत कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.