विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा काँग्रेससमोर ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव

379

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने  ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोघांमध्ये झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत  महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४ खासदार तर काँग्रेसचे २ खासदार निवडून आले आहेत. तर विधानसभेत काँग्रेसचे ४२ आमदार तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद समान असल्याची सिध्द होते. त्यामुळे जागा वाटप करताना  ५०-५० टक्के या सुत्राचा प्रस्ताव शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर ठेवल्याचे समजते.

दरम्यान, शरद पवार यांच्या या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी अद्यापही  कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी या प्रस्तावावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २८ आणि २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. यामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय केला जाणार आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२७)  यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली.