विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; अजित पवारांची मागणी

134

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – ईव्हीएम मशीनबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यामुळे  ईव्हीएम मशीनविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत केली.  

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी ते सांगवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघरे, दत्ता साने, नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, मतदाराला आपण कोणाला मतदान केले, हे कळले पाहिजे. त्यामुळे विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घेतल्यास लोकांचा गैरसमज दूर होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनबाबतचा संशय वाढला आहे. मशीनमधील चीप बदलली जाऊ शकते. जगातील अनेक देशांत निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या जात आहेत. त्यामुळे मतपत्रिकेवर विधानसभा निवडणूक घेण्यास हरकत नाही, असे पवार म्हणाले.