विधानसभा निवडणुकीसाठी वंचितसह सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणणार – बाळासाहेब थोरात

119

पुणे, दि. १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती सरकारला खाली खेचण्यासाठी  वंचित बहुजन आघाडीसह सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणणार, असे काँग्रेसचे नुतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

जे पक्ष संविधानी प्रक्रियेचा आदर करतात तसेच धर्मनिरपेक्षतेला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात  आहेत,  अशा सर्व पक्षांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे थोरात म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनासोबत घेण्याबाबतचे नियोजन कसे असेल,  याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

थोरात म्हणाले की,  राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र, त्यावेळी राज्यात काँग्रेससोबतच्या युतीबाबत चर्चा झाली नव्हती केवळ ईव्हीएमबाबत चर्चा त्यांनी केली होती. मनसेकडून आघाडीत सामिल होण्याबाबत अद्याप कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. याबाबतचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवू,’ असे थोरात यांनी यावेळी  सांगितले.