विद्वेष नको, विकास हवा – शरद पवार

242

भोसरी दि. १२(पीसीबी)- जम्मू-काश्मीरमधील हिंदू, मुस्लिम यांच्यावर ज्या काळात हल्ले झाले. त्याकाळी देशात, तेथील राज्यात भाजपच्या पाठिंबाचे सरकार होते. आता काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट काढून देशात संघर्षाचे वातावरण निर्माण केले जात आहे. काही लोक जात-धर्माच्या माध्यमातून विद्वेष वाढविण्याचे काम करतात मात्र, आम्हाला विद्वेष नको तर विकास, रोजगार हवा आहे, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आज (बुधवारी) भोसरी लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ कॉलेजच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, केरळचे आमदार के. थॉमस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, संजोग वाघेरे, मंगला कदम, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मोहंमद पानसरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, चिंचवडचे विनोद नढे, भोसरीचे पंकज भालेकर, माजी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, पक्षाचे सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ”देशात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत आहे. कोणताही धर्म कोणाचा द्वेष करा असे सांगत नाही. धर्म बंधुभाव, विकास सांगतो. काश्मीर फाइल हा काय प्रकार आहे? काश्मीर हा भारताचा भाग आहे. पण, शेजारच्या देशाला मान्य नाही. काश्मीरमधील हिंदू, मुस्लिम यांच्यावर ज्या काळात हल्ले झाले. त्याकाळी देशात, तेथील राज्यात भाजपच्या पाठिंब्याचे सरकर होते. चित्रपट काढून संघर्षाचे वातावरण निर्माण केले जात आहे. राज्य, देश विकासात आणखी कशा पुढे नेत येईल याचा सर्वांनी विचार करून काम करावे. अनेकांनी राज्य स्थापित केले. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी राज्य प्रस्थापित केले. महाराजांचे राज्य भोसले यांचे नव्हे तर हिंदवी, रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते”.

पिंपरी-चिंचवड शहर मिनी इंडिया आहे. त्याचे प्रदर्शन ईद मिलनच्या माध्यमातून आयोजित केले. ईदच्या निमित्ताने एकवाक्यता निर्माण करण्याचे आपले कर्तव्य आहे. हा सोहळा आयोजित करून शहर राष्ट्रवादीने ऐक्याचे दर्शन घडविल्याचेही पवार म्हणाले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ”वंश, धर्म, वादावर असलेली सत्ता चिरकाल टिकत नाही. श्रीलंकेची परिस्थिती काय झाली हे आपण पाहत आहोत. राष्ट्रीय समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी वाद उकरुन काढले जात आहेत. पोटाची आग भागविणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. भटके, विमुक्तांना घरे देणारे, मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करणारे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे, महिलांसाठी सैन्य दलात आरक्षण देणारे शरद पवार साहेब जातीवादी कसे असू शकतात, असा सवालही कोल्हे यांनी केला”.