विद्यावेतन वाढ मिळावी यासाठी सीपीएस निवासी डॉक्टरांचे आंदोलन

70

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): कोरोना विरोधात लढणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टरांनी विद्यावेतन वाढ मिळावी यासाठी आज (दि.1) रुग्णालयासमोर आंदोलन केले.

आम्ही जीवावर उदार होऊन कोरोनाविरोधात लढत आहोत. आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जाते. मुंबई महापालिकेप्रमाणे आम्हाला विद्यावेतन वाढ द्यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

तसेच महापालिका प्रशासन विद्यावेतन वाढ देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित आहे. रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टर 24 तास प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत.

या 33 डॉक्टरांना ऑगस्ट 2018 पासून 24 हजार 800 रुपये तुटपुंजे विद्यावेतन मिळत आहे. सध्या कोरोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती आहे.

तरीही, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. विद्यावेतन कमी मिळत असल्याने शहरात राहणे कठीण बनले आहे.

या डॉक्टरांनी सातत्याने विद्यावेतन वाढ करण्याची मागणी केली. परंतु, महापालिका प्रशासन वाढ करण्यास टाळाटाळ करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे महापालिकेत पूर्वीपासून भेदभाव न करता समान विद्यावेतन दिले जाते. मुंबई महापालिकेने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे.
आम्ही एमबीबीएस पदवी प्राप्त असून इतर निवासी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांच्यासारखेच आणि त्यांच्या इतकेच काम करत आहोत. तरीही विद्यावेतनात फार मोठी तफावत आहे.

आम्ही सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढ करण्याची मागणी सातत्याने केली. परंतु, पिंपरी महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये निराशेचे वातावरण आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.

WhatsAppShare