विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बालचित्रवाणी पूर्ववत सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

66

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सध्याच्या कोरोना महामारीत ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. मात्र सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी अॅन्ड्रॉइड मोबाईल, टॅब, इंटरनेट यांसारखी अत्याधुनिक साधने उपलब्ध नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधने नाहीत. ही बाब विचारात घेऊन विद्यार्थ्यांना घरी बसून सहजपणे आणि कमी खर्चात शिक्षण मिळेल याची व्यवस्था उपलब्ध करून देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी बालचित्रवाणी ही शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था उपयुक्त ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज विचारात घेऊन राज्य सरकारने बालचित्रवाणी संस्था पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांना केलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे, “उपग्रहाद्वारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने १९८४ मध्ये केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी या संस्थेची पुण्यात स्थापना केली. ही संस्था १९८४ ते १९९२ पर्यंत महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या संस्थेची संलग्न संस्था म्हणून कार्यरत होती. या संस्थेवर राज्य सरकारचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण होते. पुढे १९९२ मध्ये सरकारने बालचित्रवाणी या संस्थेची सार्वजनिक विश्वस्त संस्था कायद्यांतर्गत नोंदणी करून स्वायत्त केली.
बालचित्रवाणी संस्थेच्या नियामक मंडळाने ३ एप्रिल २०१७ रोजी संस्था बंद केली. राज्य सरकारने बालचित्रवाणी या संस्थेला पुण्यातील डेक्कन जिमाखाना येथील ५ एकर जागा दिली आहे. त्यावर केंद्र शासनाने बांधून दिलेली इमारत, व्हिडीओ व ऑडिओ कार्यक्रम सादर करण्याचा मोठा स्टुडिओ, एडिटिंग युनिटची मोठी यंत्रसामुग्री, संस्थेने निर्मिती केलेले सुमारे ६ हजार शैक्षणिक व्हिडीओ कार्यक्रम आहेत. सध्या या बालचित्रवाणीचा ताबा बालभारतीकडे आहे.
बालचित्रवाणीने तयार केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचे दूरदर्शनवर तब्बल ३० वर्षे प्रसारण केले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण दूरदर्शनवरून घेता येत होते. सध्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मात्र ऑनलाइन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांना घेणे शक्य नाही. विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण परवडणारे नाही. कारण ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल किंवा टॅब तसेच इंटरनेट उपलब्ध असणे गरजेचे आहे. ही साधने गोरगरीब विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध नाहीत.
अशा स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांना अगदी कमी खर्चात सहजपणे ऑनलाइन शिक्षण कसे उपलब्ध होईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी बालचित्रवाणी ही संस्था उपयुक्त ठरू शकते. या संस्थेमार्फत सर्व इयत्तांचे शैक्षणिक कार्यक्रम तयार करून ते उपग्रहाद्वारे रेडिओ आणि दूरदर्शनवरून प्रसारण केल्यास सर्वच विद्यार्थ्यांसाठी सोयीचे आणि फायदेशीर ठरेल. याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचार व्हावा आणि राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बालचित्रवाणी ही संस्था पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

WhatsAppShare