विद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहे – गिरीश बापट

100

पुणे दि.   २६ (पीसीबी) – विद्यार्थी देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठीच शासनाच्या विविध योजना आहेत. विद्यार्थी दशेत चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहस्तरावरील विविध उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगूरू विलास गायकर, बि. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळेचे योग्य नियोजन करावे तरच त्यांना विविध क्षेत्रात यश मिळू शकेल. तसेच शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा योग्य वापर करावा. एखाद्या विषयात परिपूर्ण होण्यासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास करा. समाजातील विविध घटनांची माहिती व परिस्थितीची जाण ठेवणारा विद्यार्थी यशाचे शिखर गाठतो. आजच्या स्पर्धेच्या यूगात टिकण्यासाठी व्यवहार ज्ञान असणे आवश्यक आहे. वस्तूस्थितीवर मात करून पुढे जाणे हाच यशस्वी होण्यासाठीचा मार्ग असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जन्म हा आपल्या हातात नसला तरी देखील जन्मभर चांगला माणूस म्हणून जगणे आपल्या हातात आहे, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध प्रकल्पांमधुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास होणे महत्वाचे असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते, स्टार्टअप ट्रायबल या योजनेचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाबरोबर वस्तिगृहातील शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठीचा सामंजस्य करार तसेच वसतिगृहातील विविध कामांचे मुल्यमापन करण्यासाठीचा गोखले महाविद्यालया सोबतचा सामंजस्य करार यावेळी त्यांच्या हस्ते सबंधितांकडे हस्तांतरीत करण्यात आला. तसेच ज्ञानदर्पन या पुस्तकाचे, वस्तिगृह व आश्रमशाळेच्या कॅलेंडरचे प्रकाशन बापट यांच्याहस्ते करण्यात आले.