‘विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

73

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – ‘विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’, असा चिमटा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला. १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर राज ठाकरे बोलत होते.  

राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (सोमवारी) परभणीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात इतक्या थापा मारणारे मुख्यमंत्री आणि इतके खोटे बोलणारे सरकार बघितलेच नव्हते. केंद्र व राज्यात या दोन्ही ठिकाणी आजपर्यंतचे सर्वात खोटे सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. राजकीय खेळात राज्यातील तरुणांना अडवले जात आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर चांगले करावे, पण उर्वरित महाराष्ट्रात का विकास करत नाही, महाराष्ट्राचा पैसा वापरुन वेगळा विदर्भ करण्याचा यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.   मराठवाड्याला अनेक मुख्यमंत्री मिळाले. मात्र, या भागाचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही, असेही ते म्हणाले.