विटी दांडू खेळात अजित पवारांची टोलेबाजी

23

बारामती, दि. ३ (पीसीबी) – राजकीय मैदानात टोलेबाजी करण्यात पटाईत असणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी दांडूचा खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  बारामतीत पर्यावरण दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अजितदादांनी विठू दांडी खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना नेम साधता आला नाही.  

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारामती येथे ‘एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने ‘मातीतील खेळांची जत्रा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत  अजित पवार यांनी सहभागी होऊन विटी-दांडू खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाचे आयोजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले होते.

राजकारणात प्रतिस्पर्ध्यावर निशाणा साधण्यात वाक्‌बगार असणाऱ्या अजित पवारांचा विटी-दांडू खेळताना मात्र, सहावेळा नेम चुकला. मात्र, त्यांनी विटी-दांडू खेळाचा मनापासून आनंद घेत उपस्थितांची दाद मिळवली. या महोत्सवात विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.