विजयादशमीनिमित्त आरएसएसचे उद्योगनगरीत दहा ठिकाणी पथसंचलन; पिंपळेगुरवमध्ये नगरसेविकांनी केले पथसंचलनाचे स्वागत

197

पिंपरी, दि.  ९ (पीसीबी)  –  संघाचा बदललेला गणवेश……बॅण्ड पथक……शस्त्रांची रथयात्रा आणि अबालवृद्ध स्वयंसेवकांचा मोठ्या संख्येने सहभाग…..अशा उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी  (दि. ८)  १० ठिकाणी पथसंचलन करण्यात आले. त्यामध्ये हजारो स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. पिंपळेगुरवमध्ये भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच नगरसेविकांनी संघाच्या पथसंचलनाचे स्वागत केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट असा स्वयंसेवकांचा गणवेश राहिला आहे. पंरतु, तीन वर्षांपूर्वी स्वयंसेवकांच्या गणवेशात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता स्वयंसेवक फूल पँटमध्ये दिसत आहेत. त्यानुसार विजयादशमीनिमित्त संघाने मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पथसंचलन केले. त्यामध्ये फूल पँटचा गणवेश घालून स्वयंसेवक सहभागी झाले होते.

संघाच्या वतीने पिंपळेगुरव, निगडी प्राधिकरण, पिंपरी, चिंचवडगाव, खराळवाडी, पूर्णानगर, निगडीतील रूपीनगर, आकुर्डी आणि देहूरोडमधील विकासनगर भागात सकाळी एकाचवेळी पथसंचलन करण्यात आले. त्यामध्ये संघाचे अबालवृद्ध स्वयंसेवक आणि संचलनातील कमालीची शिस्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शस्त्राची पूजा करून त्याचीही रथयात्रा काढण्यात आली. पथसंचलनामध्ये स्वयंसेवकांच्या घोष पथकाचाही समावेश होता. पथसंचलनाच्या प्रत्येक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या काढून व फुले उधळून पथसंचलनाचे स्वागत केले.

या पथसंचलनात प्रत्येक ठिकाणी ४०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा व प्रांताचे पदाधिकारी तसेच काही राजकीय पदाधिकारीही सहभागी झाले होते. पिंपळेगुरवमध्ये भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे यांनी संघाच्या पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. याठिकाणी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, संतोष कांबळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, उद्योजक माऊली जगताप, शिवाजी कदम, शिवाजी निम्हण, आदेश नवले, संतोष लहाणे यांनी पथसंचलनात सहभाग घेतला.

WhatsAppShare