विक्रीसाठी आणलेला पाच लाखांचा गांजा जप्त; चौघांना अटक

113

ताथवडे, दि. १ (पीसीबी) -विक्रीसाठी गांजा आणलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच लाख 15 हजार 375 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 29) सायंकाळी ताथवडे गावात करण्यात आली.

सुनील सुधाकर भापकर (वय 25, रा. काळेवस्ती, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रवीण उर्फ पवन दिलीप गाडे (वय 21, रा. माळेगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), आकाश महादेव खाडप (वय 20, रा. पवारवस्ती, ताथवडे), रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (वय 22, रा. ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक प्रशांत गिलबिले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील आणि प्रवीण यांनी आरोपी आकाश आणि रविराज यांना गांजा विक्रीसाठी आणून दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करत आकाश आणि रविराज यांच्याकडून पाच लाख 15 हजार 375 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्याच बरोबर आरोपींकडून साडेनऊ हजार रूपये रोख रक्कम आणि 80 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण सात लाख 24 हजार 875 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गांजा आणून देणारे आणि गांजा बाळगणारे अशा चौघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.