वाहतूक नियमांच्या दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांनीही थकवली   

195

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सहा महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन  केल्याप्रकरणी त्यांना १३ हजारांचा दंड ठोठावण्यात  आला आहे. तर  या दंडाची रक्कम मुख्यमंत्र्यांनी थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.    

वाहतुकीचे नियमांच्या उल्लंघन केल्याप्रकरणी  दंड  आकारण्यात आलेल्यांच्या यादीत राज ठाकरे, अजित पवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांचीही नावे आहेत. या यादीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव आले आहे. वाहतूक पोलिसांच्या  ‘एमटीपी’ अपच्या मार्फत ही माहिती समोर आणल्याचे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा जेव्हा निघतो, तेव्हा अन्य वाहतूक थांबवण्यात येते. सिग्नल हिरवे होतात. त्यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असतो. पण असे असताना मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना वाहतुकीचे नियम तोडण्याची वेळ का बरी यावी? हा प्रश्न पडण्याचे कारण की मुख्यमंत्र्यांच्या वाहनाने गेल्या सहा महिन्यात अनेकदा वेगमर्यादा ओलांडल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला आहे.