वाहतूक कोंडीमुळे ५६ कंपन्यांचा हिंजवडी आयटी पार्कला रामराम  

2974

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा  यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील ६ बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि ५० लहान कंपन्यांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांना कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याने कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.    

गेल्या दोन वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्यांनी  बालेवाडी आणि खराडी येथे स्थलांतरित केले होते. त्यानंतर आता आणखी पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. तर सुमारे ५० लहान कंपन्यांनी वाकड, बाणेर, बालेवाडी, तीर्थ आयटी टेक्नो स्पेस आणि पुण्याजवळील भागात  स्थलांतर  केले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधील त्यांचे ऑफ शोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओएसडीसी) बंद केल्याचे समजते. तर पुण्यातून हिंजवडीत जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे साडे तीन ते चार तास  लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.तसेच वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास उशिर होतो. वाहनांच्या इंधनावरही मोठा खर्च होत आहे. याचा छोट्या कंपन्यांना फटका बसत आहे.