वायसीएम रुग्णालयात मित्राचा वाढदिवस साजरा करुन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पिंपरी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

41

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मित्राचा वाढदिवस साजरा करुन रुग्णालयता मोठमोठ्याने आरडाओरड करुन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पिंपरी पोलिसांनी अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई केली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात घडली. ही संपूर्ण घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तब्बल ५० ते ६० टवाळखोरांनी रुग्णालयाच्या आवारात धिंगाणा घालत रुग्णालयात वाढदिवस साजरा केला. सुरुवातीला या सर्वांनी रुग्णालय परिसरात केक कापला, तसेच मोठमोठ्याने आरडाओरड करुन धुडगूस घातला. या राड्यामुळे वायसीएम रुग्णालयातील शेकडो रुग्ण भयभीत झाले. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाने तातडीने पिंपरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन तब्बल २४ तरुणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले.