वानवडी पोलीस ठाण्यात मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीबरोबर असभ्य वर्तन केल्याने अभिनेत्याला अटक

2067

पुणे, दि. ३ (पीसीबी) – मराठी सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेत्रीबरोबर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका अभिनेत्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अभिनेत्री आणि अभिनेत्याला चौकशीसाठी वानवडी पोलीस ठाण्यात बोलावले असताना अभिनेत्याने पोलिस ठाण्यातच तिच्याबरोबर असभ्य वर्तन केले.

याप्रकरणी पिडीत २३ वर्षीय अभिनेत्रीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष दत्तात्रय यादव (वय २७) या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत २३ वर्षीय अभिनेत्री ही मुंबईची रहवासी आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता सुभाष आणि तक्रारदार अभिनेत्री चित्रीकरणाच्या निमित्ताने एकत्र आले होते. आठवडय़ापूर्वीच त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. दरम्यान, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी आरोपी अभिनेत्याने एक ध्वनिचित्रफीत मोबाईलवरून प्रसारित केली होती. यामुळे अभिनेत्रीने त्याच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. यावर पोलिसांनी शनिवारी (दि.१) दोघांना चौकशीसाठी वानवडी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांकडून सुभाषची चौकशी करण्यात आली.  त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याच्या आवारात तिच्याबरोबर असभ्य वर्तन केले. अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  मात्र, आरोपी सुभाष यादवला रविवारी (दि.२) न्यायालयाने जामीन मंजूर केला.