वादळी वा-यामुळे  नुकसान झालेल्या कर्जत, खालापूरमधील शेतक-यांना लवकरच मदत  – श्रीरंग बारणे

131

 

नुकसानीचा घेतला आढावा; मुख्यमंत्री, मदत व पुर्नवसन मंत्र्यांशी केली चर्चा

पिंपरी, दि.६ (पीसीबी) – कर्जत, खालापूरमधील शेतक-यांचे वादळी वा-यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांसह आंबा, चिंकू, काजू, फणस, केळीच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतक-यांना तत्काळ मदत मिळण्यासंदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. त्यांनी तत्काळ मदत पोहचविली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या दोन ते चार दिवसात शेतक-यांना मदत मिळणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

वादळी वा-यामुळे कर्जत, खालापूरमधील शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचा शिवसेना खासदार बारणे यांनी आज (बुधवारी) आढावा घेतला. कर्जत प्रांतधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रांतधिकारी श्रीमती वैशाली परदेशी, खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत तालुका कृषीअधिकारी श्रीमती शितल शेवाळे, खालापुर तालुका कृषिअधिकारी श्रीमती अर्चना सुळ, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, गट विकास अधिकारी पंचायत समिती  कर्जत व खालापुर बालाजी पुरी आणि संजय भोय, तालुका वैद्यकीय अधिकारी कर्जत व खालापुर मोरे आणि  रोकडे  जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, नगरसेवक संतोष पाटील, जिल्हा युवा अधिकारी मयुर जोशी आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, वादळी वा-यामुळे खालापूर तालुक्यामध्ये 1660 घरांचे आणि कर्जत तालुक्यात 1154 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच आंबा, चिंकू, काजू, फणस, केळी बागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. काही प्रमाणात भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. यासंदर्भात  नुकसान भरपाई मिळावी यासाठीचा सविस्तर  अहवाल दोनही तहसील कार्यालयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्याशी माझी विस्तृत चर्चा झाली आहे. त्यांनी राज्याचे मदत व पुर्नवसन खात्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सविस्तर अहवाल पाठविला आहे त्यांच्याशी मी फोनवर बोललो आहे व तात्काळ मदत करण्याच्या सुचना दिल्या आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही मी पत्र व्यवहार केला आहे. वादळीवा-यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तत्काळ मदत देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याची विनंती केली आहे. त्यांनी अधिका-यांनाही तशा सूचना दिल्या आहेत. दोन ते चार दिवसात मदत पोहचविण्यात येईल, असे आश्वासन मला दिले आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतक-यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले आहे.

लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगारांना मूळ गावी सोडा

लॉकडाउनच्या कालावधीत खोपोली, कर्जतमध्ये अनेक कामगार अडकले आहेत. जिल्ह्याबाहेरील आणि राज्याबाहेरील कामगारांचा समावेश आहे. सरकारने कामगारांना आपल्या मूळगावी जाण्याची मूभा दिली आहे. त्यासाठी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावेत. कामगारांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात. सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

WhatsAppShare