वादग्रस्त व्हिडिओ; ‘त्यांचे’ टिकटॉक अकाउंट बंद

153

रांची, दि. ११ (पीसीबी) – दहशतवादाचे समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या हसनैन खान, फैजल शेख आणि सधान फारुकी या तिन्ही तरुणांचे अकाउंट टिकटॉकने कायमस्वरूपी बंद केले आहेत. तसेच त्यांचा वादग्रस्त व्हिडिओ ही डिलिट करण्यात आला आहे. टिकटॉकच्या नियमांचे उल्लंघन करणारे, हिंसाचाराला वाव देणारे कोणतेही व्हिडिओ खपवून घेतले जाणार नाहीत, असा खुलासा टिकटॉककडून करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये तबरेज अन्सारी नावाच्या इसमाची जमावाने मारहाण करून हत्या केली होती. तसेच त्याला मृत्यूआधी ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्यासही भाग पाडण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि सर्वच स्तरातून त्यावर टीकेची झोड उठली होती.

याचाच आधार घेत काही दिवसांपूर्वी हसनैन शेख, फैजल शेख आणि सधान फारुकी या तिघांनी एक वादग्रस्त व्हिडिओ टिकटॉकवर तयार केला. तबरेजच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा उद्या सूड घेतला तर त्याला कोणी दहशतवादी म्हणू नये, असा युक्तीवाद या व्हिडिओत करण्यात आला होता. हे तिघेही मुंबईचे रहिवाशी आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आण सोशल मीडियावरती त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. हा व्हिडिओ दहशतवादाचे समर्थन करणारा असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टिकटॉकवरही या व्हिडिओमुळे टीका केली जात होती. असा व्हिडिओ व्हायरल झालाच कसा असा सवालही विचारण्यात येत होता. त्यामुळेच हा व्हिडिओ डिलिट करून हसनैन, फैजल आणि सधानचे अकाउंट बंद करण्यात आल्याचं टिकटॉकने जाहीर केले आहे. यापुढेही अशी कोणतीच घटना खपवून घेतली जाणार नाही असंही टिकटॉककडून स्पष्ट करण्यात आले आहे.